logo

रंगारी निसर्गाचे माणसाला का वावडे?



फाल्गुन शुद्ध पौर्णिमा या दिवशी प्रत्येक हिंदू गृहात होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. त्याहीपेक्षा धुलिवंदन आणि रंगपंचमी हे दोन दिवस अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असतात ते त्या दिवशी खेळल्या जाणाऱ्या रंगोत्सवामुळे...
होळी सणाबाबत पारंपारिक पद्धतीने सांगण्यात आलेली कथा लक्षात घेतल्याशिवाय तो सण साजरा करण्यामागची भूमिका लक्षात यावयाची नाही म्हणून अगोदर ती पार्श्वभूमी समजून घ्यायला हवी.
पूर्वी हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस होऊन गेला. तो स्वतःला श्रेष्ठ समजत असे. देवतांविषयी तिरस्कार असणाऱ्या याला प्रल्हाद नावाचा मुलगा होता प्रल्हाद बालपणापासूनच विष्णू भक्त होता त्यामुळे आपल्या मुलाने अशा प्रकारे रात्रंदिवस विष्णूचे नामस्मरण करावे हे हिरण्यकश्यपूला रुचले नाही. अनेक वेळा प्रल्हादाला विष्णू भक्तीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करूनही हिरण्यकश्यपू यशस्वी ठरला नाही. तेव्हा कंटाळून त्याने आपल्याच मुलाचा वध करण्यासाठी आपल्या बहिणीची अर्थात 'होलिका 'हिची मदत घेतली. 'होलिका 'राक्षसी प्रवृत्तीची आणि क्रूर होती तिला अग्नीचे भय नव्हते असे सांगतात. म्हणून हिरण्यकश्यपुने लाकडाची चिता रचली आणि त्यावर होलिकेला बसविले. तिच्या मांडीवर प्रल्हादाला बसविले परंतु प्रल्हादाच्या भक्ती साधनेमुळे प्रल्हादाला काहीही झाले नाही उलटपक्षी होलिका मात्र जळून खाक झाली. थोडक्यात, होलिका वाईट प्रवृत्तीची असल्यामुळे तिचा अंतही वाईट झाला. त्याप्रमाणे आपल्या मनातील वाईट आचार- विचारांना ह्या होळीच्या अग्नीत जाळून या दिवशी चांगल्या गोष्टींचा संकल्प करा जेणेकरून आपले संपूर्ण वर्ष सुख- समाधानाचे जाईल हे सांगणारी पार्श्वभूमी या होळी सण साजरा करण्यामागची आहे. होलिकेचा जळून अंत झाला तो दिवस फाल्गुन शुद्ध पौर्णिमा असल्याने दरवर्षी या दिवशी होळी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात.
' होळी 'या सणाची त्या दिवशीची भूमिका लक्षात घेतली. परंतु त्यानंतर येणारी धुलिवंदन आणि रंगपंचमी या दोन दिवसाचे प्रयोजन काय असू शकेल? हा प्रश्न नेहमीच माझे कुतूहल वाढविणारा ठरला, कारण या दोन्ही दिवसांमध्ये मानवी वर्तणुकीचा विचार करता निखळ निर्मळ , स्वच्छंदी , निर्भेळ आनंदप्राप्ती हा उद्देश असू शकेल असे मुळी वाटतच नाही.
होलिकोत्सवाचे हिंदू धर्मातील स्थान त्याच्या साजरीकरणामागील मूळ उद्देश आणि त्याचे बदललेले स्वरूप याबाबत सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांनी 'पांचजन्याचा हंगाम' या लेखातून अतिशय वास्तवदर्शी आणि परखड शब्दात समाचार घेतलेला आपणास पहावयास मिळेल. साजरीकरणाबाबत उद्देश समर्पक असला तरी प्रत्यक्षात घडून येणारी कृती तितकीशी योग्य वाटत नाही, तरीही यातील विकृत आणि बिभत्स रसाचे प्रदर्शन करणारा भाग वगळला तर ह्या रंगोत्सवाकडे एका वेगळ्या दृष्टीने बघता येते.
' होलिका दहन 'या दिवसापेक्षा रंगपंचमीचा दिवस मला कायमच माझ्या मनाला उल्हासित करीत आला आहे.प्राचीन काळी मनोरंजनाची पुरेशी साधने उपलब्ध नसल्याने हा रंगोत्सव अधिक दिवस साजरा केला जात असावा.निसर्गातील विविध रंगी फुलांचा वापर करून नैसर्गिक पद्धतीने हा उत्सव साजरा केला जायचा.त्या निमित्ताने निसर्गातील बदलाची जाणीव मानवी मनाला प्रकर्षाणे होत असायची.मानवी जीवन निसर्गाच्या सहवासाने फुलायचे,बहरायचे. वसंत ऋतूतील ह्या रंगपंचमी उत्सवाच्या साजरीकरणाची हिंदू धर्मीयांची भूमिका कोणतीही असू देत, पण मला मात्र नेहमी असेच वाटत आले आहे की, निसर्गातील होणाऱ्या बदलाला पूर्वी मानव जवळून पाहू शकत होता. नानाविध वृक्षांची अवतीभवतीची विपुलता व त्यात होणारे बदल नित्याने त्याच्या नेत्रांना दर्शन घडवीत असले पाहिजेत. निसर्गातील रंगांची मुक्त उधळण जितकी कृत्रिम रीतीने आपण कागदावर उतरवल्यावर आकर्षक वाटत नाही तितकी ती निसर्गात बघताना मन वेधून घेणारी ठरते. वसंतऋतूत झाडांना फुटणाऱ्या कोवळ्या पालवीच्या लालसर वर्णांकडून अगदी गडद हिरव्या रंगाकडे होणारी त्यांची वाटचाल मनाला सुखदायी वाटली नाही तरचं नवलं. शिशिराच्या पानगळतीने निष्पर्ण झालेली झाडे हळूहळू पालवी धारण करू लागतात त्यानंतर मंजिरी आणि त्यातून फळांची निर्मिती हे सर्वच कसं मानवी मनाला आनंदित करणारे आहे. निसर्गातील बदलाचा मानवी मनावर खचितच परिणाम झाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणूनच फुलांनी फळांनी डवरलेले डेरेदार विस्तीर्ण असे आम्रवृक्षासारखे वृक्ष असतील वा निष्पर्ण होऊनही फुलांनी बहरलेले पलाश, बहावा वृक्षा सारखे वृक्ष असतील हे जणू रंगांच्याद्वारे सर्व परिसर सुगंधित आणि प्रफुल्लित करतात.
प्रत्येक रंग स्वतःचे वैशिष्ट्यपूर्ण अस्तित्व घेऊन निसर्गाला प्रसन्नता बहाल करतो.त्या रंगांची नैसर्गिकताच जणू जीवनाला विविधता आणि रंगीनता आणत असते. कृत्रिमतेच्या ठायी हे चैतन्य असणे अशक्यचं होय. अशा ह्या रंगांची मुक्त उधळण मनाला बहारदारपणा आणल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून हा रंगो- त्सव म्हणजे जणू हृदयी फुललेल्या वसंताला रंगपंचमी सणाद्वारे सामाजिक स्तरावर प्रतिबिंबित करणे होय. यातूनच वसंतोत्सव वा मदनमहोत्सव ह्या संकल्पनेद्वारे प्राचीन साहित्यातून नावारूपाला आलेले उत्सव आणि त्यांचे वर्णन ह्याच अनुभूतीला प्रदर्शित करतात. रंगांच्या वैविध्यतेमुळेचं ही सकल सृष्टी रमणीय आहे. विविध रंगी, विविध ढंगी फुले आणि पाखरे यांच्यामुळेच ही सृष्टी साजिरी-गोजिरी आहे. सृष्टीने केलेल्या रंगांच्या मुक्त उधळणीचा आस्वाद मानवानेही तेवढ्याचं विलक्षण स्वच्छंदी वृत्तीने घ्यावयास हवा होता परंतु असे होताना दिसत नाही. निसर्ग रंगाची उधळण करताना हातचे काही राखत नाही,अगदी मुक्त हस्ताने तो रंगाची वैविध्यता मानवाला बहाल करीत आला आहे.ते करताना निसर्गाने कोणताही भेदाभेद केला नाही, मग मानवाने तरी ते स्वीकारताना का भेदाभेद करावा ? निसर्गतः प्रसन्नतेची अनुभूती देणाऱ्या ह्या रंगाला मानवाने मात्र विकृत मानसिकतेतून विटविले. रंग भेदातून त्याची नैसर्गिकता ओरबाडून घेतली. रंग हे मानवी मनाला आणि त्याच्या नेत्रांना सुखदरीत्या आनंद देण्यासाठी आहेत निसर्गातील रंगांची मुक्त उधळण हेच तर सुचित करते परंतु मानवाने मात्र त्यातही हस्तक्षेप करून रंगांची निरागसता, प्रसन्नता हिरावून घेतली. वेगवेगळ्या रंगांची आपापल्यामध्ये वाटणी करून घेतली हे दुर्दैवी ठरले. कुठल्याही एका विशिष्ट समाजाने विशिष्ट रंगाला हाताशी घेऊन आपण इतरांहून वेगळे कसे हे दाखविण्याच्या उन्मादात मानव आणि मानवतेच्या हिताला बाधक ठरावी अशी कृती करणे अनुचित ठरत नाही काय? मानवी मनातील कृत्रिम भेदाभेद जपताना आपण ते भेद नष्ट करण्यासाठी आजीवन प्रयत्नरत राहणाऱ्या त्या महापुरुषांच्या कार्याचा अवमान तर करीत नाहीत ना? त्यांचेच अनुयायी बनुन त्यांच्याच विचारांना बाधक तर ठरत नाहीत ना? कोणताही धर्म मानवतेचा पूजक आहे कृत्रिम सामाजिक भेदाभेद त्याला मान्य नाही. मानवाने 'मानव' म्हणूनच जगावे. मानवता धर्माचे आचरण करावे हेच तत्व त्याला सर्वमान्य असताना आपण मात्र धर्माच्या जातीच्या नावाखाली स्तोम माजवून मानव जातीला व त्यातील मानवतेला अपाय होईल असे वागण्यात काहीच तथ्य नाही. उलट पक्षी आपण आपलीच वंचना करून घेत इतरांनाही त्यामध्ये ओढत नाहीत काय?
तात्पर्य.. रंगभेद हे फक्त माणसासाठी आहेत. सगळं काही सामावून घेण्याची ताकद फक्त निसर्गातचं आहे.
श्रीमती उज्ज्वला मोहनराव शिंदे
छ.शिवाजी माध्य व उच्च माध्य.विद्यालय.
धाराशिव.
मो. नं. ९५५२१९५१४६

14
593 views